जळगाव मिरर | १४ जुलै २०२६
लोकशाहीत विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे धोरणे, निर्णय आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे सर्वोच्च व्यासपीठ. परंतु त्याच वेळी राज्याच्या एखाद्या कोपऱ्यात संकट उभे राहिले, तर त्या संकटग्रस्त नागरिकांपर्यंत सर्वात आधी पोहोचणारे नेतृत्वही तितकेच महत्त्वाचे असते. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी पावसाळी अधिवेशनाच्या काळात याच कार्यपद्धतीचा आदर्श घालून दिला.

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूर, ढगफुटी, भूस्खलन आणि इमारती कोसळण्याच्या घटना सुरू असतानाच विधानसभेचे अधिवेशनही सुरू होते. एका बाजूला सभागृहातील कामकाज आणि दुसऱ्या बाजूला राज्यभर सुरू असलेल्या आपत्तींचे व्यवस्थापन—या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सांभाळल्या.
४ जुलै रोजी मंत्रालयात रात्री उशिरापर्यंत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी रेल्वेने नाशिकचा प्रवास केला. दुसऱ्या दिवशी नाशिकमधील कार्यक्रम पूर्ण करून ते पुन्हा मुंबईत दाखल झाले. त्याच रात्री मानखुर्द येथे इमारत कोसळल्याची दुर्घटना घडताच मध्यरात्री घटनास्थळी पोहोचून बचावकार्याचा आढावा घेतला. संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देत मदतकार्याला गती दिली.
६ जुलै रोजी विधानसभेतील कामकाज पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापनाची उच्चस्तरीय बैठक घेतली. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीचा इशारा मिळताच त्यांनी तत्काळ इगतपुरीमार्गे त्र्यंबकेश्वरकडे धाव घेतली. मेटघर किल्ला परिसरातील धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर होईपर्यंत त्यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून प्रशासनाला मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी साधुग्राम परिसराची पाहणी करून पुढील उपाययोजनांचे निर्देश दिले.
त्यानंतर पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसराचा दौरा करून त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. मुसळधार पावसात रात्री उशिरापर्यंत झांजरोळी धरणाची पाहणी करून संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन केले आणि आवश्यक खबरदारीच्या सूचना दिल्या.
जुलै रोजी पुन्हा रेल्वेने नाशिक गाठत त्यांनी गोदावरी नदी परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ते थेट पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे पोहोचले. कचरा डेपो परिसरातील दुर्घटनेनंतर घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या.
या संपूर्ण कालावधीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली गिरीशभाऊ महाजन यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे मंत्रालयातील बैठका नव्हेत; तर घटनास्थळी उपस्थित राहून निर्णय घेणे, प्रशासनाला दिशा देणे आणि नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणे.
रेल्वेचा प्रवास, रस्तामार्गावरील धावपळ, मध्यरात्रीचे दौरे, सततच्या बैठका आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा नव्या आपत्तीग्रस्त भागात उपस्थिती ही कार्यशैली केवळ प्रशासकीय कर्तव्य म्हणून नव्हे, तर जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देणारी ठरली आहे.
आज राज्यातील लाखो नागरिकांच्या मनात एक विश्वास दृढ झाला आहे संकट कितीही मोठे असो, गिरीशभाऊ महाजन घटनास्थळी पोहोचणारच. हा विश्वास भाषणांतून नव्हे, तर कृतीतून निर्माण झाला आहे. संकटाच्या प्रत्येक क्षणी प्रशासनाला गती देणारे, निर्णयाला वेग देणारे आणि नागरिकांना धीर देणारे हे नेतृत्वच आज महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेची सर्वात मोठी ताकद ठरत आहे




















