जळगाव मिरर | १५ जुलै २०२६
शहरातील आर.आर. विद्यालयातील शैक्षणिक, प्रशासकीय अनियमितता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या कार्यकरतींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. विद्यालयात गेल्या दीड वर्षांपासून नियमित प्राचार्य नसल्यामुळे प्रशासनावर प्रभावी नियंत्रण राहिले नसून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षण, शिस्त आणि सुरक्षिततेवर होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पालकांनी दिलेल्या निवेदत म्हटले आहे की, विद्यालयातील अनेक शिक्षक वेळेवर वर्गावर उपस्थित राहत नसल्याच्या तसेच नियोजित तासिका नियमित घेतल्या जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिस्त, उपस्थिती आणि सुरक्षिततेकडेही पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात काही दिवसांपूर्वी विद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूची गंभीर घटना घडल्याचा उल्लेख करण्यात आला असून, या प्रकरणातील वस्तुस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित जबाबदार व्यक्तींची भूमिका याची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये विद्यालयात तातडीने नियमित व पात्र प्राचार्यांची नियुक्ती करणे, शैक्षणिक, प्रशासकीय व सुरक्षा व्यवस्थेची स्वतंत्र चौकशी करणे, शिक्षकांच्या उपस्थिती व अध्यापनाची नियमित तपासणी करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, देखरेख आणि शिस्त नियंत्रण यंत्रणा अधिक प्रभावी करणे तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करणे, अशा मागण्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, सुरक्षितता आणि पालकांचा शाळेवरील विश्वास कायम राहावा यासाठी प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल पाटील, भुषण भोळे, विशाल महाजन, प्रशांत कोळी, राझिक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, लोकेश चौधरी, ओम चौधरी, प्रेम चौधरी , रोहन पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.




















