जळगाव मिरर | १६ जुलै २०२६
अमळनेर तालुक्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सोन्याचे दागिने करून देण्याचे आमिष दाखवत ३० वर्षीय विवाहितेचे तिच्या लहान मुलासह अपहरण करून तब्बल दोन महिने कैदेत ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात अपहरण, बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुदाम भगवान भिल्ल (रा. कलाली, ता. अमळनेर) याला बुधवारी पहाटे पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शेतमजूर असून पतीने साथ सोडल्याने ती आई-वडिलांकडे वास्तव्यास होती. तिला लाडकी बहीण योजनेचे तसेच मजुरीचे मिळून सुमारे ७० हजार रुपये मिळाले असल्याची माहिती आरोपीला होती. याच पैशांवर डोळा ठेवून आरोपीने तिचा विश्वास संपादन केला.
आरोपीने पीडितेला “सोन्याचे दागिने करून देतो, गरज पडल्यास आणखी पैसेही देतो” असे आमिष दाखवत अमळनेर येथे नेले. मात्र तिला सोनार गल्लीत न नेता दुसऱ्याच वाहनात बसवून तिचे आणि तिच्या मुलाचे अपहरण केले. यावेळी जीवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने बहाळ तसेच शिरपूरजवळील विमानतळ परिसरातील एका तांड्यावर नेल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, तेथे आरोपीने सुमारे दोन महिने पीडितेला डांबून ठेवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, आरोपी बाहेर गेल्याची संधी साधून पीडित महिला मुलासह तेथून निसटली. त्यानंतर तिने कमखेडा येथील बहिणीच्या घरी आश्रय घेत संपूर्ण घटना नातेवाइकांना सांगितली. त्यांच्या सल्ल्यानुसार तिने मारवड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साजिद मन्सुरी व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेत बुधवारी पहाटे त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.




















