मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका नागरिकाने दि. १ जुलै २०२६ रोजी नगरपंचायतीकडे लेखी स्वरूपात दाखल केली. मात्र, या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप संबंधित तक्रारदाराने केला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, नगरपंचायतीच्या विविध विभागांकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ जबाबदारीची चेंडूफेक सुरू आहे. मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “संबंधित तक्रारीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,” असे सांगण्यात आले. परंतु आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडून “हे आमचे काम नसून बांधकाम विभागाचे काम आहे,” असे उत्तर देण्यात आले. दुसरीकडे, बांधकाम विभागाकडून “हा विषय आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित येतो,” असे सांगण्यात आले.
या परस्परविरोधी उत्तरांमुळे नेमका जबाबदार विभाग कोणता, असा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी कार्यालयीन टाळाटाळीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रारीवर कारवाई करण्यास विलंब का होत आहे? संबंधित अधिकारी जबाबदारी टाळत आहेत का? कोणाच्या दबावाखाली निर्णय प्रलंबित ठेवले जात आहेत का? मुख्याधिकाऱ्यांचे आदेश प्रत्यक्षात का अंमलात येत नाहीत? की प्रशासनातील समन्वयाचा पूर्णपणे अभाव आहे?
नगरपंचायतीवर नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता आणि जलनिस्सारणासंदर्भातील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची जबाबदारी असते. अशा परिस्थितीत एका साध्या तक्रारीवरही अनेक दिवस कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.





















