जळगाव मिरर | २७ जुलै २०२६
कामावरुन घरी परतत असतांना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत संदीप सुपडू अलकरी (वय ४८, रा. अयोध्या नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील आर. एल. चौफुलीजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्यानगर परिसरात संदीप अलकरी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास असून ते एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. रविवारी सकाळी ते कामावर गेलेले होते दुपारीते कामावरुन घरी परत येण्यासाठी निघाले. महामार्गावरुन घरी परतत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप अलकरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाहन चालक वाहन घेवून तेथून पसार झाला.
महामार्गावर वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानुसार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून जखमी संदीप अलकरी यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. संदीप अलकरी यांचा अपघात झाल्याचे कळताच त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याना संदीप अलकरी यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघातात जमखी झालेल्या संदीप अकलरी यांची सुरुवातीला ओळख पटली नव्हती. त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवरुन पोलिसांनी त्यांची ओळख पटवून कुटुंबियांना त्यांचा अपघात झाल्याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून धडक देणाऱ्या वाहनाचा देखील शोध घेतला जात होता.




















