जळगाव मिरर | 10 ऑगस्ट 2026
मारवड पोलीस ठाण्यातील काम आटोपून पिंपळे रस्त्याने घरी परतणाऱ्या पोलीस अंमलदाराची दुचाकी घसरुन ते पाटाच्या पाण्यात पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच दुचाकी अंगावर पडल्यामुळे भरत एकनाथ गायकवाड (वय ४४, रा. पोलीस लाईन, अमळनेर) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना न रविवारी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास न उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील अंबाळा येथील रहिवासी असलेले भरत गायकवाड हे अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्टेबल पदावर नियुक्तीस होते. त्यांना डायल ११२ च्या कोर्ससाठी नियुक्त करण्यात आले असल्याने ते शनिवारी सायंकाळी कोर्स आटोपून पोलीस ठाण्यात परतले. पोलीस ठाण्यातील कामकाज आटोपून ते रात्री दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. घरी परतत असतांना पिंपळे रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरुन अपघात झाला. या अपघातात भरत गायकवाड हे रस्त्याच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या पाटात पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पउले. त्यानंतर दुचाकी त्यांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांच्या पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
रविवारी सकाळच्या सुमारास पिंपळे रस्त्याने जात असलेल्या नागरिकाच्या लक्षात ही घटना आली. त्याने घटनेची माहिती पोलीसांना दिल्यानंतर पोलीस अंमलदार सुनिल पाटील यांनी घटनेची माहिती गांधीलीपुरा पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेका विजय भोई हे इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पाण्यात बुडलेले हे पोलीस असल्याची त्यांनी ओळख पटविली.
पोलिसांनी मयत भरत गायकवाड यांची ओळख पटविल्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाटातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. असून त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशानुसार पोउपनि. समाधान गायकवाड हे करीत आहेत. अपघातात मयत झालेल्या भरत गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्याव्यक्तीव दुर्देवी काळाने झडप घातल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेबाबत पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.




















