जळगाव मिरर | 10 ऑगस्ट 2026
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात पेहलवान शिवाजी पाटील (शिवा) हे जखमी झाले. त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. शिवाजी पाटील हे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत तसेच आमदार अमोल जावळे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील हे आपल्या राहत्या घरून दुचाकीने व्यायामशाळेकडे जात होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच.१९.एएन.३१४३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, शिवाजी पाटील यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर जळगाव महानगरपालिकेचा असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ट्रॅक्टर चालविणारा चालक अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वाहनाच्या चालकाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, चालकाच्या वयासह अपघाताची नेमकी कारणे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून माहिती घेतली. मात्र, उपलब्ध माहितीनुसार या घटनेबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे समजते. दरम्यान, जखमी शिवाजी पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.





















