जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२६
राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे सात लाख रुपये मिळत नसल्याने सुसाईट नोट लिहून योगेश एकनाथ नेमाडे (वय ३५, रा. ईश्वर कॉलनी) या तरुणाने कंपनीतच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी एमआयडीसी परिसरातील म्हाळसाई इरिगेशन कंपनीत घडली. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ईश्वर कॉलनीत राहणारे योगेश नेमाडे व त्यांचा भाऊ मयूर नेमाडे यांची एमआयडीसी परिसरातील एम ९१ सेक्टरमध्ये म्हाळसाई इरिगेशन नावाची कंपनी आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे योगेश नेमाडे हे कंपनीत आले आणि त्यांनी कंपनीतच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार त्यांच्या भावाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ भावाला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येपुर्वी योगेश नेमाडे यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये त्यांनी उधारीचा उल्लेख केला आहे. समोरील व्यक्तीने फसविले असून ‘कंटाळा आला आहे, आता मी निघतो’ असेही म्हटले आहे. सुसाईट नोटमधील उल्लेखानुसार या कंपनीकडून राजस्थानमधील धार जिल्ह्यातील राजोद येथील एका फर्मने माल घेतला होता. त्याचे ७ लाख रुपये त्यांच्याकडून येणे बाकी होते. वारंवार कॉल करूनही पैसे मिळत नसल्याचे योगेश यांनी सुसाईट नोटमध्ये नमूद केले आहे
मयत योगेश नेमाडे यांनी सुसाईटमध्ये राजस्थानमधील फर्म व त्याच्या मालकाचे नाव लिहिले असून त्याने ७ लाख रुपयांमध्ये फसविले असल्याचे नमूद केले आहे. तसेच वारंवार कॉल करून सुद्धा तो फोन उचलत नाही. त्याने एक वेळा १३ हजार व काल ८ हजार रुपये दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पत्नीसाठी काही ओळी लिहून मुलीचा व्यवस्थित संभाळ कर असे म्हटले आहे. तसेच घरातील काही सदस्यांचे नावे लिहून त्यांना काही सल्ले देत माफीही मागितली आहे. तसेच कोणाकडून पैसे घेतले आहे, त्यांना किती पैसे द्यायचे आहे, याचाही उल्लेख सुसाईट | नोटमध्ये आहे. तसेच ‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट नक्की चेक कर’, असे भावाला यातून सांगितले आहे.
मयत योगेश नेमाडे यांचे जूने जळगावातील सासर असून त्या परिसरातील गणेश मंडळातील गणपतीची मुर्ती आणण्याकरीता ते मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईला गेले होते. तेथून ते रविवारीच घरी परतले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपविल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह मित्रांना देखील धक्का बसला आहे.





















