जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२६
भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका किन्नरावर घरात शिरुन मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. रेल्वेत काम करण्यास नकार दिल्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्कान अतुल पांडे ऊर्फ दीपक वंशकार (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या सौम्या यादव व रुक्षा सिंग यांच्यासह मुस्लिम कॉलनीतील शमशाद इब्राहीम खान यांच्या घरात गेल्या पाच महिन्यांपासून भाड्याने राहत आहेत. त्या भुसावळ ते रावेरदरम्यान रेल्वेत भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. तक्रारीनुसार, ९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्या घरात जेवण तयार करत असताना अर्षद (पूर्ण नाव अज्ञात), बाबा काल्या (पूर्ण नाव अज्ञात) व त्यांच्या सोबत दोन अनोळखी तरुण घरात आले.
या वेळी बाबा काल्याने ‘तु मेरे रेल में काम करते जा’, असे सांगितले. त्यास नकार दिल्याने संशयित आरोपी संतापले. यानंतर आरोपींनी तक्रारदारास चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अर्षदने त्यांच्या डाव्या गालावर चाकूने वार केल्याने त्या जखमी झाल्या. या वेळी रक्तस्त्राव झाला. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या सौम्या यादव यांनाही आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केली. तसेच आमच्या रेल्वेत काम करा, अन्यथा जीवे ठार मारू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेत तक्रारदार मुस्कान पांडे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलिसांनी तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठवले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी अर्षद, बाबा काल्या व त्यांच्या दोन साथीदार (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.. तपास पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात हे.कॉ. जुबेर तडवी करत आहेत.




















