जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२६
चाळीसगाव शहरात मंगळवारी दुपारी दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या आई आणि तिच्या अल्पवयीन मुलाने पित्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. सायकलच्या चाकात हवा भरण्याच्या पंपाने डोक्यावर वार करून आणि दोरीने गळा आवळून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नीला अटक करून अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गहाण ठेवलेली दुचाकी सोडविण्यासाठी पतीने पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यामुळे मुलाने सायकलच्या चाकात हवा भरण्याच्या पंपाने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, तर पत्नीने दोरीने गळा आवळला. या इसमाला दारूचे व्यसन होते. त्यातच त्याने परस्पर जमीन विकल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. यामुळेच आई व अल्पवयीन मुलाने त्याचा खून केला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.




















