जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२६
संत हराळे समाज बहुउद्देशीय संस्था, नशिराबादच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा, अनाथ बालकांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि चर्मकार समाजातील उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. महालक्ष्मी मंदिर सभागृहात रविवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत आयोजित कार्यक्रमाला समाज बांधव व भगिनींची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमात संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध सहा विषयांवर चर्चा होऊन ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यानंतर माजी शिक्षण विस्तार अधिकारी स्व. चंद्रकांत भारुळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राबविण्यात येणाऱ्या ‘अनाथ बालक दत्तक योजना’ अंतर्गत दोन पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पूर्वी पाटील व भावेश पोतदार या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, रजिस्टर, नोटबुक, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, कंपासपेटी आदी साहित्य देण्यात आले. रजनी सुरवाडे, वैशाली तायडे, इंद्रायणी भारुळे, अशोक सुरवाडे व वैशाली भारुळे यांच्या हस्ते हे साहित्य विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
यानंतर चर्मकार समाजातील ३० उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. राजेश वाडेकर होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी ‘आई कलेक्शन’चे संचालक रोहिदास कळसकर, हेक्झानेट प्रा. लि., पुणेचे संचालक कल्पेश वाडेकर, मधुसूदन मेडिकोच्या संचालक मनिषा डोळे आणि देनाली फूड्सच्या संचालक दिपाली सुरवाडे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.
इंद्रायणी भारुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून अनाथ बालकांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश देण्याचा उपक्रम पुढेही राबविला जाईल, असे सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेठ ला. ना. सा. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय वानखेडे यांनी सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता भविष्यात इतरांना रोजगार देणारी पिढी घडवावी, असे आवाहन केले. त्यांनी संस्थेला १,१११ रुपयांची, तर डॉ. युवराज सुरवाडे यांनी ५,००१ रुपयांची सामाजिक देणगी दिली.
यावेळी प्रेमराज काकडे यांची संचालकपदी निवड करण्यात आली. अध्यक्ष ॲड. राजेश वाडेकर यांनी संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून संचालक मंडळाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव तथा सेवानिवृत्त शिक्षक लिलाधर जी. भारुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष ज्ञानदेव भारुळे, गोपाळ भारुळे, प्रेमराज काकडे, मयूर भारुळे तसेच सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




















