जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२६
राज्यातील नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेवर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली असून, जनतेचा रोष व्यक्त करणारा हा मोर्चा आता थेट महानगरपालिकेवर धडकला आहे.

नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या सात नागरिकांचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांच्या मृत्यूला आपण (यमराज) नव्हे, तर महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा संदेश देत प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी या मोर्चात मांडली.
या मोर्चात संजय राऊत यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले, सत्तेत नसलो तरी लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरतो. माझ्यासमोर 10 नावे आहेत, ज्यांनी या खड्ड्यांमध्ये जीव गमावला. प्रवीण गायकवाड, उज्ज्वला शांताराम गायकवाड, प्रभाकर साहेबराव निकम, दिपली दिलीप बेळे, नीलेश प्रल्हाद खोतकर, जितेंद्र सिंह, दिलीप दामोदर काळे आणि कालच एका मुलांचे या खड्ड्यामुळे निधन झाले आहे, त्याचे नाव आहे अनुप भदाणे.
जिथे जिथे खड्डे आहेत, त्या त्या भागातल्या भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नेत्याच्या, नगरसेवकाच्या घरावर मोर्चे काढू. हा रेडा तुमच्या घरात घुसवू, शिवसेनेच्या नादाला लागू नका. आम्ही सत्तेत नसू, पण रस्त्यावर आहोत. मघाशी मी म्हणालो, सत्तेपेक्षा डेंजर आम्ही रस्त्यावर आहोत. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालेला आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या लढाया आम्हाला माहीत आहेत. आता तुमचा गिरीश महाजन थोड्या वेळाने येईल आणि तो म्हणेल यांना काय कळते? आम्हाला भ्रष्टाचारातले काहीही कळत नाही, तुलाच कळतं. लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना, कसे गेट बंद करून बसले आहेत ते. गिरीश महाजन यांना देशाचा स्वातंत्र्य दिवस कितवा हे त्याला माहीत नाही आणि इथे राज्य करतोय, अशी टीका राऊत यांनी केली.





















