जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२६
रावेर तालुक्यातील सावदा येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू व केशरयुक्त पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला सावदा पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ रंगेहात पकडले. या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूसह वाहतुकीसाठी वापरलेली होंडा अमेझ कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना २७ रोजी रात्री १०.५० वाजता राखाडी रंगाच्या होंडा अमेझ कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला. रात्री ११.०४ वाजता संशयित कार तेथे येताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. तसेच कारचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद ता. यावल) असे सांगितले. दोन पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला व तंबाखूची पाकिटे आढळली. पोलिसांनी ५ लाख २७हजार ७०० रुपयांचा पानमसाला व तंबाखू, तसेच ५ लाखांची होंडा अमेझ कार (एमएच- १९, सीव्ही-४४४५) असा एकूण १० लाख २७हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून भुसावळ व वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी आणल्याचे आरोपीने सांगितले असून या संदर्भात सारंग अवचार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावदा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश फड, पो.उ.नि. राहुल सानप, पो.हे.कॉ. नीलेश बाविस्कर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. तपास पो.उ.नि. राहुल सानप करत आहेत.




















