जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२६
एरंडोल तालुक्यातील खडके येथील पिता-पुत्रावर नर्मदा नदीत जलदुर्घटनेचे संकट ओढवले. जबलपूर परिसरातील नर्मदा नदीकाठी असलेल्या आश्रमात गेले असताना मुलगा नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली; मात्र वेगवान प्रवाहात तेही वाहून गेले, शोधमोहिमेत वडिलांचा मृतदेह सापडला असून, मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही.

गणेश शांताराम पाटील (वय ३६) व लकी गणेश पाटील (वय ११) अशी दोघांची नावे आहेत. खडके येथील संबंधित परिवारासह गावातील आणखी दोन-तीन परिवार १९ ऑगस्ट रोजी जबलपुर परिसरातील नर्मदा नदीकाठी असलेल्या सुनील महाराज उर्फ सोनू महाराज यांच्या आश्रमात गेले होते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी या आश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मोफत अन्नदानाची सेवा सुरू आहे. त्यामुळे खडकेसह परिसरातील नागरिक तेथे गेले होते.
नर्मदा नदीत सर्वांनी अंघोळ केल्यानंतर लकी पाण्याबाहेर आला होता. काही वेळाने त्याच्या पायाला माती लागल्याचे त्याच्या लक्षात आले. पायाला लागलेली माती धुण्यासाठी तो पुन्हा नदीकडे गेला. पाय धुण्यासाठी तो प्रवाहाच्या दिशेने जात असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. नदीचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून गेला. त्याचा अजूनही शोध लागलेला नसल्याचे सांगण्यात आले





















