जळगाव मिरर | 3 सप्टेंबर 2026
भुसावळच्या राजकारणात गुरुवारी मोठी राजकीय घडामोड घडली. मुंबईतील नंदवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

भुसावळ तसेच जळगाव जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गायत्रीताई भंगाळे यांच्यासह अनिल चौधरी यांच्यासारख्या स्थानिक राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्ती शिवसेनेत दाखल झाल्याने आगामी काळात त्याचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
या नव्या राजकीय वाटचालीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील, उपनेत्या सरिता माळी कोल्हे आणि जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनिल चौधरी आणि गायत्रीताई भंगाळे यांच्या नेतृत्वाला संघटनात्मक पातळीवर नवी ताकद मिळण्याची शक्यता आहे. भुसावळ शहरासह जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा नेमका किती परिणाम होतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
भुसावळमध्ये यापूर्वी विविध राजकीय पक्ष आणि गटांमध्ये असलेली स्थानिक समीकरणे लक्षात घेता, या पक्षप्रवेशाकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घटना म्हणून पाहिले जात आहे. आगामी काळात शिवसेना आपली संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कोणती भूमिका घेते आणि अनिल चौधरी व गायत्री भंगाळे यांच्या नेतृत्वाचा पक्षाला कसा फायदा होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात कोणते नवे समीकरण आकाराला येते, याची उत्सुकता आता वाढली आहे.




















