जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२६
शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एका तरुणावर कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १२ तासांत तीन आरोपींना अटक केली आहे. आनंद हरी पाटील (वय २४), हर्षल रवींद्र शिंदे (वय २०) आणि गौरव विनोद पाटील (वय २०), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील परिसरात हा प्रकार घडला. खेडी येथील रहिवासी किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१) हे धंदा भंगार व पानटपरीचा व्यवसाय करतात. संशयितांनी त्यांच्याकडे पान-सिगारेट मागितली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने संशयितांनी बाविस्कर यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच, दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आनंद पाटील याने त्याच्याकडील धारदार कोयत्याने, तर हर्षल शिंदे याने तलवारीने किशोर बाविस्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी पाहणी करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आनंद पाटील, हर्षल शिंदे आणि गौरव पाटील या तिघांना अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोहकों रामकृष्ण पाटील, प्रदीप चौधरी, संजीव मोरे, नितिन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे, शशिकांत मराठे, रमाकांत सालुंखे, सुभाष साबले, राहुल पाटील या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.





















