जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२६
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील जामदा फाट्यावर उभ्या असलेल्या २९ वर्षीय तरुणीला बसने जोरदार धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात प्राची महेंद्र पवार (वय २९, रा. नवेगाव, मेहुणबारे) हिचा मृत्यू झाला. घटनेमुळे मेहुणबारे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राची पवार ही ७ सप्टेंबर रोजी सकाळी चाळीसगाव येथे राहणाऱ्या आपल्या काकूला भेटण्यासाठी घरातून निघाली होती. दरम्यान, जामदा फाट्याजवळ ती उभी असताना धुळ्याकडून येणाऱ्या बसने (एमएच ४९, बीझेड ८२७६) तिला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच प्राचीचे वडील महेंद्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी प्राची बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णवाहिकेतून मेहुणबारे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातप्रकरणी महेंद्र नारायण पवार यांच्या फिर्यादीवरून बसचालक नीलेश अशोक सोळंके (रा. वलठाण, ता. सोयगाव) यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




















