जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२६
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एआय जनरेटेड व्हिडिओ तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणाने आता नशिराबादपर्यंत धडक घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (रा. ताजनगर) याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सी. जोसेफ विजय हे सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री असून (टीव्हीके) या पक्षाचे प्रमुख आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आल्याचा संशय आहे. या अकाउंटवर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल स्वरूपातील छायाचित्रे तसेच विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.
दरम्यान, चेन्नई सायबर क्राईम पथकाकडून संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सच्या वापराबाबत आयपी लॉग, डिजिटल उपकरणे, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्यात मोहम्मद जुनेद शेख याची चौकशी सुरू असल्याचे समजते. तपासातील निष्कर्ष आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असून, त्याला पुढील तपासासाठी चेन्नई येथे नेले जाण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.




















