जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२६
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरातील विनोद किराणा स्टोअर्सवर कारवाई करून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा ६८ हजार १८ रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून नचिकेत सुनील येवले (वय २२, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १७ सप्टेंबरला हिरापूर रोडवरील मे. विनोद किराणा स्टोअर्स येथे तपासणी करण्यात आली. या वेळी पंच व चाळीसगाव शहर पोलिसांच्या उपस्थितीत दुकानाची झडती घेतली असता किराणा मालासोबत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवल्याचे आढळले. पथकाने विविध १३ प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा ताब्यात घेतला. त्यातील प्रातिनिधिक नमुना विश्लेषणासाठी घेतले असून उर्वरित साठा पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दुकानाचे संचालक विनोद सुदाम वाणी (वय ५१) असल्याचे तपासात समोर आले. साठा कोठून आणला, याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्रीच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.





















