जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२६
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिसांनी दहिवद येथील बसस्थानकावर सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत ओमनी वाहनातून सुमारे ३ लाख ३२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पानमसाला व तंबाखू जप्त केला. गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली सुमारे १ लाख रुपये किमतीची ओमनी व १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी मेहुणबारे येथील हितेश अनिल अहिरराव (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शिरोळ, हवालदार मिलिंद कुमावत, प्रकाश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पाटील, दीपक महाजन हे सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दहिवद गावातील बसस्थानकावर (एमएच १८ एस ६६२) क्रमांकाची ओमनी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच वाहनचालकाची भंबेरी उडाली. पोलिसांनी वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता चालकाने किराणा माल असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चालकासह वाहन मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास घातक असलेला विमल पानमसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.
पोलिसांनी चालक हितेश अनिल अहिरराव याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुटखा धुळे येथील बिलाल (पूर्ण नाव माहित नाही) याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. प्रतिबंधित गुटख्याची विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुटख्यासह ओमनी व मोबाईल असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले या करीत आहेत.




















