जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२६
रामेश्वर कॉलनीतील २८ वर्षीय महिला बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात पद्यालयच्या जंगलात तिचा दगडाने चेहरा ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. कविता मिस्तरी (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्यासोबत गेल्याचे समोर आलेला मित्र नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (वय २८, रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता या दोन मुलांसोबत राहत होत्या. त्या गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पतीपासून विभक्त होत्या. ८ सप्टेंबरपासून त्या वेपत्ता होत्या. याबाबत ९ सप्टेंबरला पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान कविता या नरेश सोनवणे याच्यासोबत दुचाकीवरून जाताना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. कविताच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता महसावदजवळ मोबाइल बंद झाल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी पद्मालयच्या जंगल परिसरात शोध घेतला. तेथे दगडाने चेहरा ठेचलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. कविताने घरातून निघताना घातलेले कपडे कुटुंबीयांनी ओळखले.
कविता व नरेश एकत्र गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जळगावपासून म्हसावदपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या मार्गावर दोघे जाताना दिसले; मात्र महसावदनंतर पुढील फुटेजमध्ये ते आढळले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी एरंडोलच्या दिशेनेही सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेथेही दोघांचा ठावठिकाणा लागला नाही. त्याचवेळी मोबाइल लोकेशन तपासले असता कविताचा मोबाइल म्हसावदजवळ बंद झाल्याचे स्पष्ट झाले. या धाग्यावरून पोलिसांनी पद्मालयच्या जंगल परिसरात शोध घेतला. तेथे कविताचा मृतदेह आढळला.





















