जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२६
बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही बालकलाकारांसाठी ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्राच्या सहकार्याने आज (दि. २०) सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. मूळजी जेठा महाविद्यालय परिसरातील कवि कालिदास सभागृहामध्ये होणाऱ्या या महोत्सवात लोकनृत्य, लोकसंगीत, लोकगायन आणि लोकवाद्य या कलाप्रकारांचा समावेश असणार असून, जिल्ह्यातील अनेक शाळा आणि सांस्कृतिक संस्थांच्या बालकलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती नीलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील २८ बालरंगभूमी परिषदेच्या शाखांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या संघांना लातूर येथे होणाऱ्या महाअंतिम स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
या महोत्सवात समूह गायन, समूह नृत्य, एकल गायन, एकल वाद्य वादन आणि एकल नृत्य अशा पाच प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहेत. सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, उत्तम आणि प्रशंसनीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या संघांना सन्मानित केले जाणार आहे. या ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात बालकलाकारांच्या सादरीकरण पाहून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकर रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे तसेच कान्ह ललित कला केंद्राचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे.





















