पंचामृत अभिषेक, ध्वजारोहण, ५६ भोग आणि श्री महाभोमयागाचे आयोजन; भाविकांना दर्शन, तीर्थप्रसादाचे निमंत्रण
जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२६

अमळनेर येथील श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती असलेल्या येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने विधीवत साजरा होणार आहे. मंगळग्रह सेवा संस्थेने भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी या अलौकिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. मंदिराच्या इतिहासात हा दिवस सर्वांत मोठा आणि परम पवित्र मानला जातो. यानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात अतिशय भक्तिमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण असणार आहे.

दिवसभरातील कार्यक्रम
पहाटे ४ वाजता श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेकाने या सोहळ्याची सुरूवात होईल. सकाळी ६ वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा होईल. सकाळी ७ वाजता मंदिरावरील जुने ध्वज विधीवत उतरवून नवे ध्वज लावण्यात येतील. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची महाआरती होऊन देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला जाईल. यानंतर दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित असलेल्या समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचेही आयोजन केले आहे. सायंकाळी ५ वाजता श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाद्यवृंदासह वाजतगाजत पालखी मिरवणूक निघेल. त्यानंतर ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाधुपारती होईल.
भाविकांना आवाहन
श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांनी केले आहे.
काय आहे मंदिराचे वेगळेपण?
खानदेशची भूमी गौरवान्वित करणारे हे मंदिर केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच भूमीमातेची दाक्षिणात्य शैलीतील एकमेव मूर्ती आणि पंचमुखी हनुमानजींची मूर्ती आहे. तसेच परिसरात भगवान श्री गुरुदत्त-माता श्री अनघालक्ष्मी यांच्या मूर्ती असलेले कमंडलूस्थित आणि भगवान श्री कालभैरव-माता भैरवी यांचे त्रिशूलात्मकस्थित विश्वातील एकमात्र मंदिर आहे.





















