जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२६
राज्यातील पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीवरून २३ वर्षीय विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून उंड्री-वडाचीवाडी परिसरातील वैष्णवी प्रवीण जरांडे या विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी दहा तोळे सोने दिले होते. तसेच लग्नासाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्च केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पतीच्या मागणीनुसार नातेवाइकांनी दुचाकीही दिली होती. लग्नानंतर वैष्णवी काही दिवस सासरी राहिली. त्यानंतर नोकरीनिमित्त ती बेंगळुरू येथे गेली. जूनअखेरीस ती पुन्हा सासरी आली आणि घरातूनच आयटी कंपनीचे काम करू लागली. सासूकडून घरकामावरून टोमणे मारले जात असल्याचे, तसेच पती आणि सासरे अपमानास्पद बोलत असल्याचे वैष्णवीने माहेरी सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
१० जून रोजी पती ओंकारने वैष्णवीच्या वडिलांना फोन करून चारचाकी घेण्यासाठी पाच लाख रुपये द्यावेत किंवा गाडी घेऊन द्यावी, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. लग्नासाठी मोठा खर्च झाल्याने आणखी पैसे देणे शक्य नसल्याचे वडिलांनी सांगितले. त्यानंतर माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी वैष्णवीला त्रास दिला जात असल्याचे तिने आईला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वैष्णवी गर्भवती असल्याचेही तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
१९ सप्टेंबरपासून वैष्णवी हिंजवडी येथील आयटी कंपनीतून काम करत होती. दिवसभर काम केल्यानंतरही तिला घरातील कामे करावी लागत असल्याचे ती माहेरी सांगत होती. २४ सप्टेंबरच्या रात्री तिने आईला फोन करून सासरी त्रास होत असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास पती ओंकारने वैष्णवीच्या आईला फोन करून, “तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाही तर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल,” असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर कुटुंबीयांनी वैष्णवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. २५ सप्टेंबरच्या पहाटे नातेवाइकांकडून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर आई-वडील उंड्री येथील घरी पोहोचले. तेथे वैष्णवी मृतावस्थेत आढळून आली. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती ओंकार घिसरे याच्यासह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.




















