जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२६
जामनेर तालुक्यातील पहूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना घरी कुणी नसल्याची संधी साधून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहूर येथे २८ सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. मीनल सुनील पाटील (वय १८) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना मीनल हिने घराची कडी आतून लावून घेतली होती. मीनलची आजी घरी आल्यावर दरवाजा उघडण्यास सांगितले. परंतु, बराच वेळ दरवाजा न उघडला नाही, तसेच आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर, दरवाजा उघडला असता मीनल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. त्यानंतर पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी सकाळी ९ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, मीनल अभ्यासात हुशार आणि अज्ञाधारक विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिने माध्यमिक शिक्षण सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातून घेतले. त्यानंतर आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून दहावीची परीक्षा तिने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेने तिला ध्वजारोहणाचा बहुमानही दिला होता. सध्या ती जामनेर येथील सुरेशचंद्र धारिवाल महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती.




















