जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२६
शेतात गेल्यानंतर रात्रीही घरी न परतले शेतकरी सतीश युवराज पाटील (वय ५१, रा. किनोद, ता. जळगाव) हे शेतात मृतावस्थेत आढळले. ही घटना दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील किनोद येथील शेतकरी सतीश पाटील हे मंगळवारी शेतात गेले होते. रात्री ते घरी परतलेच नाही. त्यामुळे बुधवारी त्यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी गेला असता ते शेतात पडलेले आढळले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. तसेच उष्माघाताचे लक्षणे आढळले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.





















