जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२६
बीएएमएस या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे सांगत मोहित रमेशराव येवले (वय ३०, रा. नशिराबाद) या तरुणाची सात लाख २५ हजार रुपयात फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दि. १४ जानेवारी ते दि. २० ऑगस्ट या दरम्यान घडला. तरुणाला बनावट गुणपत्रक व इतर कागदपत्रे दिल्याचे उघड झाल्याने याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यावरून जळगाव येथील अभिज्योत करिअर फार्मच्या संस्थापक मनीषा अजय जोशी व त्यांचे पती अजय जोशी या दोघां विरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीट परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्याने मोहित येवले यांनी अभिज्योत करिअर फार्म मध्ये विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांना दहा लाख रुपये लागतील असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी आठ लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांना भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद पुणे नावाचा बनावट स्टॅम्प असलेले गुणपत्रक देण्यात आले. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी संबंधिताकडे पैशाची मागणी केली असता त्यांना धनादेश देण्यात आले. मात्र ते बाऊन्स झाले. यादरम्यान त्यांना केवळ ७५ हजार रुपये परत देण्यात आले. उर्वरित रक्कम परत मिळत नसल्याने मोहित येवले यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















