जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२६
पाचोरा पिंपळगाव गोलाईत येथील शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चोरीस गेलेली बैलजोडी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव गोलाईत शिवारातील शेतगट क्रमांक १०५ मधील शेतातून मावळी जातीचे, पांढऱ्या रंगाचे, सरळ व लांब शिंगे असलेले, अंदाजे ७ ते ८ वर्षे वयाचे दोन बैल चोरीस गेले होते. या बैलजोडीची किंमत सुमारे २ लाख ५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पाचोरा पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.
या तपासादरम्यान आरोपी संजय प्रल्हाद पाटील, राहणार सातगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव, तसेच अन्य संशयितांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध कारवाई करत चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत केली. यासोबतच गुन्ह्यात वापरण्यात आलेला निळ्या रंगाचा विनानंबरचा टेम्पोही जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे ७ ते ८ वर्षे वयाची मावळी जातीची बैलजोडी, किंमत २ लाख ५ हजार रुपये, तसेच निळ्या रंगाचा विनानंबरचा टेम्पो, किंमत ८० हजार रुपये, यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि पाचोरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सुसते, पोलीस कर्मचारी दीपक पाटील, ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, वैभव देशमुख आणि हेमंत सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतातून चोरीस गेलेल्या बैलजोडीचा शोध लागला असून, परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.





















