जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२६
कमी शिकल्याचा गैरफायदा घेत विश्वास संपादन करून बनावट ओळखपत्र तयार केले आणि एका व्यक्तीच्या नावावर १५ लाख ८५ हजार रुपये किमतीची थार गाडी खरेदी केल्याचा प्रकार चाळीसगावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भिकन देवराम पाटील (रा. वाघडू, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल चौधरी (रा. टाकळी प्र.चा.), भूषण चौधरी (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) आणि विशालचे अन्य दोन मित्र यांनी संगनमत करून त्यांच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार केले. या कागदपत्रांच्या आधारे थार गाडी खरेदीसाठी १५ लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, भिकन पाटील यांना कोणत्याही शोरूममध्ये न नेता त्यांच्या नावावर परस्पर गाडीची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर (एमएच ५२ बी ७३७७) क्रमांकाची थार गाडी कुठेतरी लपवून ठेवून त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार डिसेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भिकन पाटील यांचे घर तसेच नाशिक येथील अशोक स्तंभाजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेशी संबंधित असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस करीत आहेत.




















