जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२६
शहरालगत असलेल्या पठाणबाबा दर्गा परिसरातील टेकडीवर आग लागून शेकडो एकरवरील गवत जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबानी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पठाणबाबा दर्गा परिसरातील टेकडीवरील गवताला रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग वाऱ्यामुळे पसरत जाऊन कुंभारखोरीपर्यंत वाढत गेली, तसेच वेगवेगळ्या परिसरात पसरली. यात शेकडो एकरवरील गवत जळून खाक झाले. तसेच सरपटणाऱ्या प्राणी, पशुपंक्षांना इजा झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. मुख्य अग्नीशमन अधिकारी अश्वजित घरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आग विझविली. जवळपास दीड तासानंतर आग नियंत्रणात आली. सोबतच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आग विझविली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी एकतर पेटता फटाका उडाल्याने अथवा कोणीतरी पेटती बिडी, सिगारेट फेकल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.




















