जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२६
दिवाळीच्या सणासुदीत नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असणाऱ्या तेल कंपन्यांवर अचानक छापा टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका कंपनीतील ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४४२५ किलो तेल जप्त करून सील करण्यात आले.

सध्या दिवाळीमुळे खाद्यतेलाची मागणी वाढली आहे. याचा गैरफायदा घेऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी एफडीएच्या पथकाने जळगाव एमआयडीसीतील ७ प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांची कसून तपासणी केली. एका कंपनीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ४,४२५ किलो तेलाचा साठा जागेवरच जप्त केला. ही संपूर्ण कारवाई अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिदि यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, किशोर साळुंखे आणि आकाश बोराडे यांच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, जप्त आणि सील केलेला साठा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत वापरता येणार नाही.





















