जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२६
शेतीच्या नावाखाली शेतात चक्क गांजाची अवैध लागवड सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चोपडा तालुक्यातील खायापाडाव शिवारात उघडकीस आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची तब्बल १ हजार ८७० किलो वजनाची झाडे जप्त केली असून, त्यांची बाजारभावानुसार किंमत तब्बल ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अहवालानुसार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी चोपडा तालुक्यातील खायापाडाव शिवारातील वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक २४० मध्ये गांजाची अवैध लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शुभम ज्ञानेश्वर पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात जुम्मा आरसी पावरा (रा. खायापाडाव, ता. चोपडा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची हिरवी झाडे, पाने, फांद्या आणि मुळांसह संपूर्ण पीक जप्त केले आहे. तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉलीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन १ हजार ८७० किलो असून, प्रति किलो २५ हजार रुपये या बाजारभावानुसार त्याची किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये इतकी होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आल्याने या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ मधील कलम २०(ब), २२ व २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.





















