सामाजिक बांधिलकीतून सुवर्णा अंभोरे व जनार्दन मगरे यांचा प्रेरणादायी उपक्रम
जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२६

वाढदिवसाच्या उत्सवावर होणारा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व पर्यावरणविषयक उपक्रमांना हातभार लावण्याचा प्रेरणादायी निर्णय पर्यावरणप्रेमी सुवर्णा अंभोरे यांनी घेतला. मुलीच्या वाढदिवसानिमित्त खर्चिक उत्सव करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील विद्यार्थ्यांना ३० टी-शर्ट भेट देऊन तसेच शाळेच्या विविध उपक्रमांसाठी आर्थिक मदत करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
या उपक्रमासाठी रामलीला वेलनेस सेंटरचे संचालक जनार्दन मगरे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा मदतीचा हात पुढे करण्यात आला.
आजच्या काळात वाढदिवस, समारंभ व उत्सवांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत असताना, त्या खर्चातून समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उपक्रमांसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी मदत करणे ही काळाची गरज आहे. सुवर्णा अंभोरे व जनार्दन मगरे यांनी आपल्या कृतीतून आनंद साजरा करण्याची एक वेगळी आणि समाजाभिमुख संकल्पना मांडली.
विद्यार्थ्यांना मिळालेली ही भेट केवळ टी-शर्टपुरती मर्यादित नसून, सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि दातृत्वाचा संस्कार देणारी ठरली. अशा उपक्रमांमुळे शाळेच्या विविध नावीन्यपूर्ण कार्यांना बळ मिळत असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची प्रेरणा मिळत आहे. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सुवर्णा अंभोरे मॅडम व जनार्दन मगरे यांचे आभार व्यक्त केले. वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता न ठेवता विद्यार्थ्यांच्या भविष्याला हातभार लावणे, हाच खऱ्या उत्सवाचा अर्थ असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.





















