जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२६
शेतशिवारातील अरुंद रस्त्यावर डंपर मागे घेताना दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ५५ वर्षीय आजोबांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली अवघ्या चार वर्षांची नात सुदैवाने बचावली. भुसावळ तालुक्यातील पिंपरीसेकम शिवारात बुधवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित डंपर पेटवून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तपट कठोरा येथील रहिवासी आनंदा मुकुंद पाटील हे आपल्या चार वर्षांच्या नात परी हिच्यासोबत शेतशिवारात गेले होते. दरम्यान, शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी एमएच १९-३७३७ क्रमांकाचा डंपर आला होता. अरुंद रस्त्यावर चालक डंपर मागे घेत असताना मागील बाजूस असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीसह आनंदा पाटील डंपरखाली दबले गेले. अपघात इतका भीषण होता की, आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्यांच्यासोबत असलेली चिमुरडी परी सुदैवाने बचावली. या घटनेने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाची जबाबदारी, अपघाताची परिस्थिती आणि डंपर पेटविण्याच्या घटनेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. डंपर खाली अडकलेल्या आनंदा पाटील आणि दुचाकीला बाहेर काढून त्यांना तातडीने वरणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी डपर पेटवून दिला. काही वेळातच आगीने डंपरला वेढले आणि परिसरात धुराचे लोट पसरले. डंपर पेटविल्याची माहिती मिळताच वरणगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंबाच्या मदतीने डंपरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली.




















