जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२६
एरंडोल शहरालगत समर्थ बैठक हॉलजवळील सर्व्हिस रोडवर शुक्रवारी दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात शास्त्री महाविद्यालयातील बी. फार्मसीचा विद्यार्थी जयेश अनिल पाटील (रा. तामसवाडी, ता. पारोळा) याचा मृत्यू झाला. तर सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील (२५, रा. पातरखेडा) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री महाविद्यालयाकडून एरंडोलकडे येणाऱ्या मोटरसायकलवर महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्याचवेळी तुराटखेडा येथील नागरिक एरंडोलकडून सर्व्हिस रोडने आपल्या गावाकडे जात होते. दोन्ही मोटरसायकलींवर तिघे-तिघे प्रवास करत असल्याची माहिती आहे. समर्थ बैठक हॉलजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात जयेश पाटील याचा मृत्यू झाला. तसेच शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी निखिल दिनेश पवार (रा. नानखुर्द, ता. एरंडोल) जखमी झाला असून तो माजी सभापती गबाजी अण्णा पाटील यांचा नातू असल्याचे सांगण्यात आले. सुधाकर कुंभार, हा देखील शास्त्री महाविद्यालयातील फार्मसीचा विद्यार्थी असून तो जखमी झाला आहे. तुराटखेडा येथील दिगंबर तुकाराम पाटील (२१), कुणाल जिजाबराव पाटील (२१) आणि सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील (२५) हे एरंडोल येथे कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. खरेदी करून ते गावाकडे परतत असताना हा अपघात झाला. सचिन पाटील यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर एरंडोलमधील खासगी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





















