राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार सादर करणार गायन, वादन आणि नृत्याचे कार्यक्रम
जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२६

भारतीय अभिजात संगीताचा खानदेशातील सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने ७ ते १० जानेवारी २०२७ दरम्यान करण्यात आले आहे. रौप्य महोत्सवी २५ वा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात दररोज सायंकाळी ६ ते ११ या वेळेत होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आहेत. सुहान्स केमिकल्स प्रा. लि. आणि होस्टिंग ड्युटी अर्थात चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य लाभणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ७ जानेवारीला उद्घाटनानंतर पुण्यातील पंडिता मंजुषा पाटील कुलकर्णी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना लिलाधर चक्रदेव संवादिनीवर, तर आशय कुलकर्णी तबल्यावर साथ देतील. त्यानंतर पंडिता शमाताई भाटे यांचे शिष्य प्रमोद वाघ, श्रेया कुलकर्णी आणि नयन कोहले ‘त्रिमिती’ हा कथक नृत्याविष्कार सादर करतील.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात झी टीव्हीवरील ‘सारेगमप’ (हिंदी) रिअॅलिटी शोमधील सहेजदीप सिंग यांचे गझल व ठुमरी गायन होईल. त्यांना अमनदीप सिंग तबल्यावर, तर अंशदीप सिंग दिलरुब्यावर साथ देतील. दुसऱ्या सत्रात बनारसचे प्रख्यात कथक नर्तक पं. रुद्र शंकर मिश्रा नृत्य सादर करतील. त्यांना पखावजावर त्यांचे गुरू व पिताश्री पं. माताप्रसाद मिश्रा, तबला व पढंतवर उदयशंकर मिश्रा आणि सारंगीवर ओम सहाई मिश्रा साथ करतील.
तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या डेप्युटी डायरेक्टर पंडिता भारती राजपूत यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. पं. कुमार गंधर्व यांच्या परंपरेतील भारती राजपूत कुमारजींच्या अनवट बंदिशी आणि निर्गुणी भजने सादर करतील. त्यांना तबल्यावर निशांत शर्मा, तर संवादिनीवर सुप्रिया मोडक-जोशी साथ देतील. त्यानंतर पं. रामदास पळसुले आणि पं. कृष्णा साळुंखे यांची तबला-पखावज जुगलबंदी होईल. त्यांना पं. अजय जोगळेकर संवादिनीवर साथ करतील.
चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात स्वराधीश डॉ. पं. भरत बलवल्ली यांचे नाट्यसंगीत आणि अभंगवाणी सादर होईल. त्यांना ऑर्गनवर मकरंद कुंडले, तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर, बासरीवर वरद कवठापूरकर साथ देतील. कार्यक्रमाचे निरूपण मंगला खाडिलकर करतील. नवीन पिढीला अभिजात संगीताची गोडी लागावी, या उद्देशाने खास जेन-झीसाठी अभिजीत पोहनकर आणि सहकारी ‘बॉलीवुड घराना’ हा कार्यक्रम सादर करतील. याच कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होईल.
गेली २५ वर्षे प्रतिष्ठान नवीन पिढीला अभिजात संगीताची ओळख करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरुण आणि ज्येष्ठ अशा दोन्ही पिढ्यांनी अनुभवावा असा हा स्वरोत्सव असून, चारही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी सौ. मंगला खाडिलकर करणार आहेत. महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि प्रायोजकांनी केले आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे. प्रवेशिकांसाठी दीपिका चांदोरकर यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८२३०७७२७७ किंवा २२२७७२२ वर संपर्क साधावा, असे प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.





















