
पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील कळमसरा येथे २६ वर्षीय अविवाहित शेतकऱ्याचा विहीरीतुन पिण्याचे पाणी काढत असतांना पाय घसरून विहीरीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हरि राजु मोरे (वय – २६) रा. कळमसरा ता. पाचोरा हे दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतातील पिकास फवारणी करत होते. दरम्यान हरि मोरे यांना पाण्याची तहान लागल्याने शेतात असलेल्या विहीरीतुन पाणी काढण्यासाठी गेले होते. विहीरीजवळ चिखल असल्याने त्यांचा पाय घसरला व ते विहीरीत पडले.
सदरचा प्रकार शेजारील शेतात काम करणाऱ्यांच्या लक्षात येताच हरि मोरे यांना विहीरी बाहेर काढण्यात आले. मात्र विहीरीत जास्त पाणी असल्याने हरि मोरे यांचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. हरि मोरे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी हरि मोरे यांना मृत घोषित केले. मयत हरि मोरे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे हरि मोरे यांच्या अकस्मात मृत्युने कळमसरा सह परिसरात शोककळा पसरली आहे. घटने प्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.




















