
भुसावळ : प्रतिनिधी
शहरालगत महामार्गावरील हॉटेल मधुबन जवळ ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह बुधवारी दुपारी ३ वाजता आढळला. हा मृतदेह सुमारे आठवड्यापासून तेथे पडून असल्याचा अंदाज आहे. फॉरेन्सिक शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असले तरी हा घातपात असू शकतो असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली.
मधुबन हॉटेलपासून काही अंतरावरील जागेत एका महिलेचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह पडून असल्याची माहिती शक्तीकुमार तिवारी यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांसह घटनास्थळ गाठले. यानंतर पंचनामा करून मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. तत्पूर्वी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर चौधरी, डॉ. भालचंद्र चाकूरकर यांनी मृतदेहाची पाहणी केली. यानंतर पोलिसांनी हा घातपात असू शकतो. मात्र, फॉरेन्सिक शवविच्छेदनानंतर कारण समोर येईल असे सांगितले. या महिलेचा चेहरा छिन्नविछिन्न झाला आहे.




















