जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आजी, बाबा, आई, वडील यांच्याकडून वाढदिवसाची पूर्व तयारी करून घेत असलेल्या १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण कनाशी गावात शोककळा पसरली आहे. तर या दुःखद घटनेने संपूर्ण परिवार शोक सागरात बुडाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कजगावपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी येथील रहिवासी तसेच पाचोरा आगारात चालक म्हणून सेवारत असलेले महेंद्र महाले यांचा १० वर्षाचा मुलगा हर्षवर्धन हा सकाळी शाळेत जाण्यासाठी गणवेश घालून तयार होता. हर्षवर्धन हा दप्तरसह जेवणाचा डबा घेऊन घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला. मात्र, आपली सायकल शेतात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने सायकल घेऊन येतो, मग शाळेत जातो, असे सांगितले. दरम्यान, सायकल घेण्यासाठी हर्षवर्धन हा शेतात गेला. परंतु, सायकल घेण्यापूर्वीच काळाने या बालकावर घाला घातला. शेतातील एक सिमेंटचा पोल हर्षवर्धन या बालकाच्या अंगावर कोसळला. या दुर्दैवी घटनेत तो गतप्राण झाला. तर हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच, हर्षवर्धन या बालकाच्या बचावासाठी सारेच सरसावले. मात्र, त्याचा काहिही उपयोग झाला नाही. दरम्यान, घरी हर्षवर्धनची शाळेत जाण्यासाठी वाट पहात असलेल्या कुटुंबीयांना ही दुःखद बातमी कळल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. तर दुर्दैवी घटनेत हर्षवर्धन याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.
हर्षवर्धनचा येत्या शनिवारी म्हणजे ३० रोजी वाढदिवस होता. त्याची तयारी स्वतः त्यानेच सुरू केली होती. यासाठी २ दिवसांपूर्वी वडील महेंद्र महाले यांना घेऊन तो भडगाव येथे गेला. तेथे स्वतःच्या पसंतीचे ५ हजारांचे कपडे त्याने घेतले. तर वाढदिवसासाठी मोठा केक मागवायचा आहे, माझे सर्व मित्र येणार आहेत, गिफ्ट म्हणून तुम्ही मला एक रिमोटची कार आणा, अशी सारी तयारी वडिलांना सांगत त्यांनी करून घेतली. तर येणारा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्याची तयारी करणाऱ्या हर्षवर्धनचा वाढदिवसाच्या ५ दिवसांपूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबीय दुःखात बुडाला आहे.