जळगाव मिरर | ४ जून २०२३
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा.येथील तुळसाई नगरात भूखंडाच्या जागेवर सभा मंडपाचे काम सुरू आहे. या कामासाठी खडीने भरलेल्या डंपर (एम. एच. ४६ बीबी ८०६७) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सागर पुंजाराम पवार (गुजर) यांचा तीन वर्षांचा मुलगा समर्थ पवार याचा जागीच मृत्यू झाला.
अंगावर डंपरचे चाक गेल्याने त्यात त्याचा बळी गेला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेनंतर चालक डंपर सोडून पळून गेला. संतापलेल्या लोकांनी डंपरची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे. रात्री उशिरा शहर पोलिसांत विनोद विठ्ठल गुजर यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचा तपास करण्यात यावा, अशी मागणी या भागातील रहिवासी व मृत बालकाच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्याचप्रमाणे टाकळी प्र.चा. भागात खडी व अवैध गौण खनिजाने भरलेल्या अवजड वाहनांवरदेखील बंदी आणावी, अशी मागणी होत आहे.