
जळगाव मिरर | १४ मे २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकाची धामधुम सुरू असताना पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे शहर शिवसेना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली असून शिवसेना पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विचारात घेतले नसल्याची नाराजी व्यक्त करत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीकडून पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. अशातच शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे तसेच पक्षाचा ग्रुपही सोडल्याची बातमी समोर आली आहे.
लोकसभा निवडणूक संपताच पुण्यातील गटात धुसफुस समोर आली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच युवासेनेतील आणखी पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेनेची फादर बॉडी ही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळीच शिवसेना शिंदे गटातील नाराजीनाट्य समोर आले होते. पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान एकनाथ शिंदे हे शिवसेना शहरअध्यक्ष नाना भानगरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते. त्यांच्या जेवणाची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी जेवणास नकार दिला, त्यामुळे पदाधिकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती.