जळगाव मिरर | २९ मे २०२५
पोलिसांचा ड्रेस घालून आलेल्या दुचाकीस्वारांनी पोलीस असल्याची बतावणी करीत संजय भगीरथ सोमाणी (वय ५९, रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा) यांना थांबवले. त्यांच्याजवळील सोन्याच्या चैनसह अंगठी चोरट्यांनी हातचालाखी करीत चोरुन नेली. ही घटना दि. २७ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळ्यातील सोमाणी गल्लीत राहणारे संजय सोमाणी हे दि. २७ रोजी सकाळी शहरात खरेदीसाठी आले होते. खरेदी झाल्यानंतर ते दुचाकीने घरी जातांना त्यांना बजरंग बोगद्याच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मागून पोलिसांचा ड्रेस घातलेल्या दुचाकीस्वारांनी थांबवले. यावेळी त्यांनी बाबा आम्ही तुम्हाला केव्हाचे आवाज देत आहोत, तुम्ही का थांबत नाही असे म्हणत त्यांना अडविले. त्यानंतर सोमाणी यांनी त्यांना लायसन्स देखील दाखविले. त्यातील एकाने तुमच्या हातातील अंगठी व सोन्याची चैन काढून ठेवा. पंजाब व उत्तरप्रदेश येथून लोक आले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे सोमाणी यांनी अंगठी व चैन काढून त्याच्याजवळील रुमालात ठेवण्यास सांगितले.
चैन व अंगठी रुमालात गुंडाळल्यानंतर सोमाणी यांनी तो रुमाल खिशात ठेवून ते तेथून निघून गेले. त्यानंतर ते सोमाणी शाळेत गेले. त्यांनी मुख्यध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी खिशातून रुमाल बाहेर काढला असता, त्यामध्ये एका कागदात्र गुंडाळलेले सोन्याच्या दागिन्यांऐवजी दोन दगड मिळून आले. सोमाणी यांनी मुख्याध्यापकांसह घटनास्थळी येवून पाहणी केली. मात्र ते चोरटे तेथून पसार झाले होते. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशतियांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.




















