जळगाव मिरर । २ डिसेंबर २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना आता नाशिकहून कोकणात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा कराड तालुक्यातील वाठार येथे भीषण अपघात झाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू असलेल्या खड्ड्यात बस कोसळल्याने ३५ ते ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील एका विद्यालयाची सहल कोकणात गेली होती. रविवारी दिवसभरात या विद्यार्थ्यांनी कोकणातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर रात्री उशिरा ५० ते ६० विद्यार्थ्यांना घेऊन ही बस नाशिककडे परतत होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास बस कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत पोहोचली. त्यावेळी चालकाला अंदाज न आल्यामुळे महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात ही बस कोसळली.
अपघातानंतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिक त्याठिकाणी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य राबवून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.





















