
जळगाव मिरर । १२ जानेवारी २०२३ ।
बजाज फायनान्सचे कार्यालय फोडून ८६ हजार ३९० रुपये आणि हिशेबाची चिट्ठी काढून नेणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांच्यासह पाच ते सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पवार यांच्या आई सुरेखाबाई मधुकर पवार (ढेकू रोड) यांनी बजाज फायनान्सच्या अमळनेर शाखेकडून ४ लाख २७ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याचा हप्ता दरमहा भरण्याचे ठरले असताना डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेतील खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने बाऊन्स झाला.
ललित सूर्यवंशी, जयेश कदम हे कर्मचारी ईएमआय रक्कम घ्यायला गेले असता प्रथमेश पवार याने १० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत देतो असे सांगितल्याने कर्मचारी परत गेले. १० रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास प्रथमेश पवार, सनी सुरेंद्र अभंगे व सचिन सुरेंद्र अभंगे (दोन्ही रा. चोपडा नाका) यांच्यासह पाच ते सहा तरुण महाराणा प्रताप चौक न्यू प्लॉट येथील बजाज फायनान्स कार्यालयात घुसले व शिवीगाळ करत हातातील लाकडी दंडक्याने खुर्च्या, लॅपटॉप, संगणक असे साहित्याची तोडफोड सुरु केले.
ड्रॉवरमधील अॅडव्हान्स हप्त्याची ठेवलेले ९६ हजार १४५ रुपयांपैकी ८६ हजार ३९० रुपये आणि हिशेबाची चिट्ठी काढून घेतली आणि घरी वसुलीला आले तर पाहून घेईल अशी धमकी दिली.तसेच कपाट, कुलर, व्हीलचेअर, सीसीटीव्ही कॅमेरे असे दोन अडीच लाखांचे नुकसान केले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यावरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत. दरम्यान, आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने आरोपीना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.




















