
जळगाव मिरर | ३१ मार्च २०२६
मुंबईत शिंदे गटाचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर सोमवारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दीर्घकाळ गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या शिवतारे यांची दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिस घ्यावे लागत होते. अखेर त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी स्वतःची किडनी दान करून वडिलांना नवजीवन दिले.
गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या उपचारांनंतर ही शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर विजय शिवतारे आणि डॉ. ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे समाजातही भावनिक प्रतिसाद उमटत असून, वडिलांसाठी मुलीने केलेल्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. ममता शिवतारे या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पत्नीबद्दल अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरा गेलो, पण तुझ्या एका निर्णयाने मला आतून हलवून टाकलं.” त्यांनी पुढे नमूद केले की, गेल्या तीन महिन्यांपासून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासण्या, कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर प्रक्रिया ममता यांनी एकट्याने सांभाळली, आणि ते केवळ साक्षीदार म्हणून तिच्यासोबत होते.
पत्नीच्या धाडसाचा गौरव करत त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले, “देव मुलगी का देतो, याचे उत्तर मला आज मिळाले.” आयसीयूमध्ये पत्नीच्या शेजारी बसताना भावना आवरता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेच्या निमित्ताने ‘मुलगी ही देवाची सर्वात मोठी देणगी’ असल्याची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. समाजातही या घटनेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, नात्यांमधील निःस्वार्थ प्रेमाचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.






















