जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२६
वडिलांच्या उपचारासाठी त्यांना दुचाकीवरून जळगावकडे घेऊन जाणाऱ्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. घार्डी फाटा परिसरात अज्ञात ट्रॅक्टरने दिलेल्या भीषण धडकेत मोहम्मद लुकमान ठोके (वय ३९) आणि त्यांचे वडील लुकमान खा मुसे खा ठोके (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे चोपडा तालुक्यातील लासूर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील लासूर येथील रहिवासी असलेले लुकमान खा ठोके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा मुलगा मोहम्मद लुकमान त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जळगावकडे घेऊन जात होता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दोघे दुचाकीवरून लासूर-जळगाव मार्गावरून जात असताना, घार्डी फाटा परिसरात समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. मोहम्मद लुकमान हे भंगार विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष आणि वडिलांचे एकाच अपघातात निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, जळगाव येथील नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी शासकीय रुग्णालयात उपस्थित राहून नातेवाईकांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेमुळे लासूरसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




















