जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव शहराच्या राजकारणात अलीकडेच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामध्ये शहरातील प्रभावशाली शिरसाळे परिवारातील माजी नगरसेवक चेतन नारायण शिरसाळे आणि त्यांचे पुतणे गौरव पंकज शिरसाळे यांचाही समावेश आहे. त्यामुळे शिरसाळे परिवारातील तिसरी पिढी जळगाव शहराच्या राजकारणात सक्रिय झाली आहे.
शहराच्या विकासात शिरसाळे परिवाराचे ऐतिहासिक योगदान
जळगावच्या राजकारणात शिरसाळे परिवाराचे नाव अनेक दशकांपासून जनसेवेचे प्रतीक राहिले आहे. 1975 च्या दशकात स्व. नारायण(बाबा) केशव शिरसाळे यांनी जकात सभापती म्हणून उल्लेखनीय कार्य करत सलग पाच वेळा नगरसेवक म्हणून सेवा दिली. सन 1991 च्या जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत या परिवारातील तीन सदस्य कलाबाई नारायण शिरसाळे, अरुण नारायण शिरसाळे आणि स्व. अर्जुन नारायण शिरसाळे हे एकाच वेळी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पुढे स्व.अर्जुन शिरसाळे यांनी सलग तीन कार्यकाळ बिनविरोध नगरसेवक राहून कार्य केले, तर स्व.लाजवंती अरुण शिरसाळे यांनीही 1999 व 2003 मध्ये नगरसेवकपदाचा मान मिळवला. या काळात अरुण नारायण शिरसाळे यांनी नगरपालिकेत बांधकाम सभापती, आरोग्य सभापती आणि उपनगराध्यक्ष या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आपली वेगळी छाप पाडली.
चेतन शिरसाळे यांची जनसेवेची परंपरा कायम
या वारशाला पुढे नेत चेतन नारायण शिरसाळे यांनी 2013 मध्ये खानदेश विकास आघाडी तर्फे महानगरपालिका निवडणुकीत दमदार विजय मिळवत नगरसेवक म्हणून सेवा दिली. 2019 मध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी चेतन शिरसाळे यांनी सामाजिक कार्य आणि जनसेवा यामध्ये सातत्य राखले. नागरिकांच्या अडचणी सोडवणे, रुग्णसेवा, तसेच सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेणे करोना काळात नागरिकांना सलग दोन महिने भोजनाची व्यवस्था व दवाखान्याची मदत या कार्यांमुळे ते प्रभागातील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.
गौरव शिरसाळे मनपा निवडणुकीच्या रिंगणात
चेतन शिरसाळे यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित होत त्यांचा पुतण्या गौरव पंकज शिरसाळे याने यंदाच्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधून उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांनीही त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला असून, नव्या जोशात शिरसाळे परिवाराचे तरुण नेतृत्व शहराच्या विकासासाठी पुढे येत आहे.
मंत्री महाजनांच्या नेतृत्वावर विश्वास
शहरातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याचे चेतन शिरसाळे यांनी सांगितले. “गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जळगावच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना काळात गरजवंतांना मदतीचा हात
सन 2019 मध्ये आलेल्या कोरोना महामारीच्या कठीण काळात चेतन शिरसाळे आणि त्यांच्या परिवाराने गरजवंत नागरिक, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना अन्नधान्य, औषधे, ऑक्सिजन सिलिंडर तसेच अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. अनेकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्या काळात शिरसाळे परिवाराने कोणताही दिखावा न करता नि:स्वार्थ जनसेवा केली, ज्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.



















