जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२५
येथील योगीराज श्री गजानन महाराज बहुउद्देशिय संस्था आणि भक्त परिवाराच्यावतीने १४७ व्या श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त इंद्रप्रस्थ नगरातून श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीत मोठ्या संख्येने भाविकभक्त सहभागी झाले होते. यावेळी ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष करण्यात आला.
शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील केशरबाग परिसरात श्री गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त चारदिवसीय उपक्रम घेण्यात आले. दि. १७ फेब्रुवारीपासून दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत श्री गजानन विजय ग्रंथ सामूहिक पारायण झाले. तर बुधवारी रात्री भजन संध्येमध्ये भाविक दंग झाले होते. तर गुरुवारी प्रकट दिनी सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक होऊन नंतर पादुका पूजन, होम हवन आणि दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी ४ वाजता पालखी मिरवणूक सोहळा पार पाडला.
‘गण गण गणात बोते’ च्या जयघोषणात केशरबाग परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरापासून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीत श्री गजानन महाराज यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. या मूर्तीची ठिकठिकाणी महिला भाविक पूजा करीत होत्या. तर महिला, पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर मंगल कलश, तुळस, श्रींची पादुका घेऊन सहभागी झाले होते. तर लहान मुले, वयोवृद्ध सुद्धा मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले होते. ही पालखी जुने राधाकृष्ण नगर, भारत नगर, केशर बाग यामार्गे येऊन मंदिरात पालखीचे विसर्जन झाले. त्यानंतर दीपोत्सव साजरा होऊन श्रींची महाआरती करण्यात आली.
यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष बी चव्हाण, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव गणेश शेळके, संचालक मंडळातील आरती कपोत्ते, योगेंद्र पवार, डॉ. सोपान पाटील, प्रवीण कुळकर्णी, सतीश भोसले, दीपक गुरव, राहुल पातरवर, वैभव जैन, राजगुरू बडगुजर, सतीश वाणी आदींनी परिश्रम घेतले.