
जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२४
मतदार यादी पडताळणीचे काम करत असताना एकाने पिस्तूलचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादाखक घटना घडली आहे. यात संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांकडून संशयिताचा तपास सूरू असून या घटनेमुळे चाळीसगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरात फिर्यादी जय चौधरी, निखील पवार, विष्णू चौधरी हे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्या सूचनेने या परिसरात मतदार यादी पडताळीचे काम करत होते. या वेळी किरण घोरपडे हा साथीदारांसह आला अन् तुम्ही येथे काय करत आहात, असे त्याने विचारले. दरम्यान, मतदार यादी पडताळणीचे काम करत असल्याचे सांगूनही किरण घोडपडे याने शिवीगाळ करत त्यांना लाथबुक्यांनी मारहाण केली. तसेच मतदार यादी हिसकावन घेतली.
या वेळी फिर्यादी जय चौधरी याने सोमनाथ चौधरी यांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर त्यांनी किरण घोरपडे यास जाब विचारला. त्याचवेळी किरण घोरपडे याने खिशातून पिस्तूल काढत गोळी झाडण्याची धमकी दिली. या वेळी झालेल्या झटापटीदरम्यान त्याची पिस्तूल खाली पडली. तर यानंतर किरण घोरपडे व त्याचे साथीदार हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. त्यांनतर जय चौधरी व साथीदारांनी ही पिस्तूल पोलीस ठाण्यात जमा करुन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांकडून संशयित आरोपींचा तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.






















