जळगाव : प्रतिनिधी
नॅशनल युनिर्व्हसिटी सिंगापूर येथे नोकरीस लावून देण्याचे आमिष देत एका भामट्याने प्राध्यापकाची 10 लाख 87 हजार 488 रुपयात फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांतीलाल पितांबर राणे (वय 49, रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, एम. जे. कॉलेज परिसर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कांतीलाल राणे हे हैद्राबाद येथील के. एल. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत. 14 सप्टेबर 2021 रोजी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन फोन आला. आम्ही प्लेसमेंटचे काम करतो, जगभरातील विविध देशांमध्ये असलेल्या नामांकीत विद्यापीठांमध्ये आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो, तुम्हाला अप्लाय करायचा आहे का? अशी विचारणा समोरच्या व्यक्तीने केली. राणे यांना देखील परदेशात नोकरी करायची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस प्रतिसाद दिला. यानंतर राणे यांच्या प्रतिसादानंतर त्यांना वेळोवेळी अनेक मोबाईल क्रमांकावरुन फाेन येऊ लागले. यात शिल्पा आणि आर. एम, करणसिंग असे नाव सांगून त्यांच्याशी संवाद सुरु होता. सिंगापूर विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या बहाण्याने या अज्ञात भामट्यांनी राणेंकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 29 जुलै 2022 पर्यंत वेळोवेळी पैसे तब्बल 10 लाख 87 हजार 488 रुपये दिले. यानंतरही राणे यांच्याकडे पैशांची मागणी सुरूच होती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच राणे यांनी दिलेले पैसे परत मागीतले. यानंतर भामट्यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे निश्चित झाल्यानंतर राणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.